सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण

| Updated on: Jul 09, 2024 | 7:58 PM

शिंदे -जगताप यांच्या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी आमदार जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिले होते.

सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट, राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट
Follow us on

करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी सकाळी सोलापूर येथे जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांचा एकांतात तब्बल अर्धा तास झालेल्या भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यातच आहे. चर्चेवेळी खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या, अशी माहिती आहे. या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेतील विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या शिंदेंनी पक्षवाढीसाठी आपल्या मुळ काँग्रेसी जुन्या सहकाऱ्यांची मोट बांधणे सुरू केल्याचेच हे द्योतक आहे. शिंदेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या करमाळा मतदारसंघातून जयवंतराव जगताप यांना ताकद देत पुन्हा काँग्रेस बळकटीचे त्यांचे धोरण आहे .

शिंदे -जगताप यांच्या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी आमदार जगताप काँग्रेसतर्फे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना समर्थन दिले होते. या निवडणुकीवेळी जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती. यावेळी जगताप यांनी त्यांचा यथोचित सत्कार करत जनतेला सूचक संदेश दिला होता.

जयवंतराव जगताप यांचे वडील माजी आमदार नामदेवराव जगताप निष्ठावंत काँग्रेसी होते. पक्षसंघटनेच्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यावर मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांचे संघटीत जाळे होते. जयवंतराव जगताप यांनी १९९० ते १९९५ आणि २००४ ते २००९ दोन वेळा आमदार म्हणून काम केलं आहे. तसेच तब्बल तीस वर्षे करमाळा बाजार समितीचे सभापती, राज्य बाजार समिती संघाचे संचालक, प्रदीर्घ काळ सोलापूर डिसीसी बँकेचे संचालक आणि उपाध्यक्ष पद, आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले आहे.

जयवंतराव जगताप यांची प्रतिक्रिया काय?

जयवंतराव जगताप हे सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून करमाळा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रभावी व्यक्तिमत्वाचा, वक्तृत्त्वाचा मोठा दबदबा आहे. निष्ठावंतांची एकगठ्ठा मते हे आजही जगताप गटाचे बलस्थान असून जगतापांच्या भूमिकेवरच करमाळा विधानसभेचा निकाल अवलंबून आहे ही वस्तुस्थिती आहे. याविषयी जगताप यांना विचारले असता त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. तसेच शिंदे साहेबांचे आणि माझे खूप जुने ऋणानुबंध आणि भावनिक नाते आहे. स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे जरी पक्षीय पातळीवर काही वेळा वेगळे निर्णय घेतले गेले असले तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा, त्यांचे माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. तसं होणारही नाही. भावनिकदृष्ट्या आणि वैचारिक दृष्टया माझी सुशिलकुमार शिंदे, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशीच नाळ असल्याचे जगताप यांनी सांगितले .

या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे व जगताप यांची भेट फक्त सदिच्छा भेट नसून या मागे अनेक राजकीय गुपिते दडले असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने नुकतेच २८८ विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. त्यासाठी जगताप यांच्यासारख्या सक्षम उमेदवारांची नावे पुढे करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा काँग्रेसच्या रणनीतीचा देखील हा एक भाग असू शकतो.