एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ओवैसी त्यांच्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सोलापुरात आले. पण मंचावर येताच पोलिसांनी त्यांच्या हातात नोटीस दिली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओवैसी यांना पोलिसांकडून मंचावरच नोटीस देण्यात आली आहे. ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस पोलिसांनी दिली. पोलिसांनी ओवैसी यांना भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस दिली. या नोटीसचा उल्लेख ओवैसी यांनी आपल्या भाषणात करत टीका केली. असदुद्दीन ओवैसी यांनी संबंधित नोटीस जाहीर भाषणात वाचून दाखवत उडवली खिल्ली उडवली. त्यांनी इंग्रजीमध्ये दिलेल्या नोटीसमधील स्पेलिंग मिस्टेक दाखवत खिल्ली उडवली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
“सरकार सांगतेय की आम्ही हे दिले ते दिले. पण हे काय तुमच्या बापाचे आहे का? जनतेचा पैसा आहे. हिंदू-मुस्लिम लढाई लावायचं पाहणार की महागाई पाहणार आहात? सोलापूरला GI मानांकन असलेली चादर बनते. पण मोदीजी कधीही मन की बातमध्ये सोलापूरच्या चादरवर काही बोलत नाहीत. जरांगे पाटील यांनी सरकारच्या नाकात दम करून ठेवला आहे. मी मराठा समाजाला मानतो. त्यांनी ज्या पद्धतीने ताकद दिली त्यामुळे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
“तो छोटा मुलगा म्हणतोय, मी मशिदीत घुसून मारतो. अरे त्याच्यावर काय गुन्हा दाखल केला? काही केले नाही”, अशी टीका ओवैसी यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरुन केली. “दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण फडणवीसजी सगळे एक आहेत. संसदेत BNS चा कायदा पास होत होता तेव्हा म्हणालो होतो, या कायद्याचा दुरुपयोग होणार आहे. हा कायदा चुकीचा बनवला आहे. अल्पसंख्यांक, विचारवंत यांना त्रास देणारा हा कायदा आहे. या कायद्यानुसार कोणालाही 120 दिवस जेलमध्ये ठेवता येते”, असं ओवैसी म्हणाले.
“लोकांना वाटते माझी दाढी पांढरी झाली म्हणजे मी म्हातारा झालो. पण वाघ कधी म्हातारा होत नाही. मोदीजी इथे आल्यावर त्यांना नोटीस दिली नाही. कारण ते म्हणाले, एक है तो सेफ है. ते का म्हणाले हे सांगा? पण मला मात्र नोटीस दिली गेली”, असं ओवैसी म्हणाले.