अजित पवार गटात मोठं वादळ, मुख्य प्रवक्ता राजीनामा देण्याच्या तयारीत, काय घडतंय?

| Updated on: Sep 27, 2024 | 7:24 PM

सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठं वादळ आलं आहे. कारण राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे संतापले आहेत. उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तसं वक्तव्य देखील केलं आहे.

अजित पवार गटात मोठं वादळ, मुख्य प्रवक्ता राजीनामा देण्याच्या तयारीत, काय घडतंय?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सहकार परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. त्यामुळे राजन पाटील यांना थेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वाद उफाळून बाहेर आलेला असताना त्यांची निवड झाल्याने राजन पाटलांचे पक्षात पारडे जड असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उमेश पाटील हे नाराज झाले आहेत. उमेश पाटील हे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मी पदाचा राजीनामा लिहून ठेवला आहे, असं उमेश पाटील म्हणाले आहेत. उमेश पाटलांनी राजीनाम्याचे बंद पाकीट दाखवले. “राजन पाटील ही दुरागृही, अत्याचारी व्यक्ती आहे हे मी अजित पावरांना सांगितले होते. त्यामुळे माझा राजन पाटलांना विरोध राहणार आहे”, अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली. त्यामुळे मोहोळमध्ये अजित पवार गटात मोठं वादळ आल्याचं बघायला मिळत आहे.

मोहोळमधील जन सन्मान यात्रेत अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी राजन पाटलांना न्याय दिला नसल्याचे विधान केले होते. मात्र लवकरच राजन पाटील राज्याच्या राजकारणात दिसतील, असेही विधान त्यांनी केले होते. राजन पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचे पक्षातील वर्चस्व कमी झाल्याचे चिन्हं आहेत. राजन पाटील यांना ही मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर उमेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उमेश पाटील काय म्हणाले?

“राजन पाटलांनी सहकारी कारखाना खासगी करून स्वतःच्या नावावर केला. शेतकऱ्यांचा कारखाना हडप करणाऱ्या नेत्याला सहकार परिषदेचा अध्यक्ष करणे हे हास्यस्पद आहे. मात्र सरकारने त्याच राजन पाटलांना दिले. सहकारी संस्था मोडीत काढणे, हडप करणे असा अनुभव असलेल्या नेत्याला सहकार परिषदेचे अध्यक्ष केले आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. मोहोळ तालुक्यातील माणसाला सहकार परिषद अध्यक्ष केले त्याबद्दल अभिनंदन. मात्र त्या व्यक्तीला नेमले हे दुर्दैवी”, अशी भावना उमेश पाटील यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“राजन पाटील DCC बँकेचे अध्यक्ष असताना बँक बुडीत गेली. त्यामुळे सहकार बुडावण्याचा अनुभव आहे म्हणून त्यांना अध्यक्ष नेमले का? असा सवाल आहे. राजन पाटलांना अध्यक्ष करणे हे सहकार चळवळी समोरचा मोठा धोका आहे. त्यांना 10 ते 12 दिवसासाठी जरी नेमले तरी त्या दिवसात चळवळीला धक्का आहे”, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

“राजन पाटील यांच्या मागे मोहोळ तालुका नाही हे जन सन्मान यात्रे दिवशी कळून आले. राजन पाटील हा मोहोळ तालुक्यातील लोकांना माहिती आहे की तो कसा आहे, पण महाराष्ट्राला कळावं म्हणून माझा विरोध आहे. पक्षातील लोकांना वाटत असेल की, त्यांच्यामुळे मोहोळची राखीव जागा निवडून येते. पण त्यात त्यांचे योगदान नाही हे पक्षाला माहिती नसेल. मोहोळची जागा निवडून येत नाही हे 100 टक्के सत्य आहे. विधानसभेला ही जागा निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितले”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.