सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरात सध्या फक्त सोलापूर पोलिसांची (Solapur Police) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची हवा आहे, कारण दोन्ही विभागांनी धडकेबाज कारवाईत दमदार कामगिरी बजावली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने महाराष्ट्रात विक्रीस बंदी असणारे 1 हजार 374 मद्याचे (Whiskey) बॉक्स पकडले आहेत. ज्याची किंमत 1 कोटी 1 लाख 94 हजार रुपये असून दोन कंटेनरसह 1 कोटी 25 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मद्यात विदेशी मद्य असून यामध्ये टुबर्ग बियर (Beer) , इंप्रियल ब्लु , मॅकडॉल नंबर वन व्हिस्की , रॉयल स्टॅग आदी मद्याचा समावेश असून या सोबत 2 वाहन चालक आरोपींना पकडण्यात आले असल्याची माहिती सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिलीय. त्यामुळे एकापेक्षा एक भारी ब्रँड आणूनही त्यांची निराशा झाली आहे, कारण दारू रिचवण्यासाधीच पकडली गेली आहे.
पोलिसांनी तडीस लावलं मोठं प्रकरण
तर दुसरीकडे सोलापूर शहर पोलिसांचीही दमदार कामगिरी पहायला मिळालीय. कारण सोलापूर पोलिसांच्या टीमने दोन महिन्यापूर्वी एका राज्यस्तरीय घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. मात्र आता त्यानंतर सोलापूर पोलिसांच्या टीमने केवळ दोनच महिन्यात या घरफोडीच्या टोळीविरोधात तपास पुर्ण करत फिर्यादींना मुद्देमाल परत करण्याची अनोखी कामगिरी केलीय. सोलापूर पोलिसांनी या घरफोड्या करणाऱ्या टोळीकडून एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर त्यातील 17 लाख 50 हजारापैकी 12 लाख 21 हजाराचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.
सोलापूरसह, कर्नाटकातील मुद्देमाल परत केला
सोलापूर शहरासह कर्नाटकातील फिर्यादींना केवळ 2 महिन्यात मुद्देमाल परत करत सोलापूर पोलिसांनी अनोखी कामगिरी केलीय. आजवरच्या इतिहास अशाप्रकारे गुन्हेगाराला शिक्षा होण्यापूर्वीच फिर्यादींना त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याची ही पहिलीच घटना आहे. यासाठी अनेक कायदेतज्ञ तसेच न्यायाधिशांची परवानगी घेऊनच हा मुद्देमाल फिर्यादींना देत असल्याची माहिती पोलिस आयुक्त हरीष बैजल यांनी दिली. त्यामुळे सोलापूर पोलिसांचे फिर्यादींनी आभार मानले आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडेला मुद्देमाल मिळण्यासाठी अनेकांना कित्येक दिवस पोलीस स्टेशनच्या आणि कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात मात्र सोलापूर पोलिसांनी लाकांचा हा ताण कमी करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या दोन मोठ्या प्रकरणांनी सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.