सोलापूरः हिवाळी अधिवेशन चालू असतानाच ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्राही राज्यातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जोरदार सुरू आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज महाप्रबोधन यात्रेत बोलताना केंद्र सरकारपासून राज्य सरकार पर्यंत आणि नरेंद्र मोदी यांच्यापासून ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांचा समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत विरोधकांवर जोरदार पणे त्या कडाडल्या आहे.
ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केली आहेत. त्या नेत्यांद्दल भाजपमधील एकही नेता त्यांचा राजीनामा मागत नाही म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यातील रोजगार, उद्योग आणि विकासाच्या राजकारणावर त्यांनी बोट ठेवले.
राज्यात येणारे प्रत्येक प्रकल्प परराज्यात का जात आहेत असा सवालही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्या म्हणाल्या की, उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला म्हणत या सरकारने काय खेळ लावला आहे बघा असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कारभारावरही सडकून टीका केली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईचा फटका जनसामान्यांना कसा बसला आहे. ज्या सरकारने जीएसटी लावली आहे.
ती अगदी दारूपासून ते माणसं मेली की जे कफन म्हणून कापड आणलं जातं त्यावरही यांनी जीएसटी लावला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली आहे का असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, कारण त्यांना त्याची भीती वाटते असा टोलाही त्यांना लगावला आहे.
बेरोजगारी आणि महागाईवर बोलताना सुषमा अंधारे यांनी बेरोजगारी आणि महागाईमध्ये भारत हा जगातल्या टॉप 12 मध्ये असल्याचे सांगत आपला बेरोजगारीचा दर हा 8 टक्के असल्याचाही त्यांनी सांगत केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे.