सोलापूर (सागर सुरवसे) : मागच्यावर्षी राज्यात सत्तांतर झालं. 40 आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. याच शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपासोबत मिळून सरकार बनवलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ठाकरे गट आणि भाजपामधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आधी सुद्धा दोघांमध्ये शाब्दीक संघर्ष व्हायचा. पण आता या टीकेने टोक गाठले आहे. ठाकरे गट आणि भाजपाकडून परस्परांवर टीका करताना अत्यंत बोचऱ्या, टोचणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो. काहीवेळा वापरलेले शब्द राजकीय संस्कृतीला धरुन नसतात. मात्र, सध्या अशाच पद्धतीची टीका सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
“नितेश राणे ज्यांच्या जीवावर तू भुकतोय, त्यांची राज्यातील आणि दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार आहे. त्याचबरोबर तुला आणि तुझ्या बापाला दिल्लीत जागा मिळणार नाही. संजय राऊतजी उद्धव साहेबाना भेटायला कधीही जाऊ शकतात. पण तुला तुझ्या भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी 17 जणांना भेटावं लागतं. नितेश राणे तुला तुझ्या नेत्यांना भेटण्यासाठी नेत्यांचे तळवे चाटावे लागतात” अशी टीका शरद कोळी यांनी केली. तत्पूर्वी आज नितेश राणे यांनी नवीन संसद इमारतीच्या मुद्यावरुन संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली होती.
नितेश राणे संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणाले?
“मी 20 वर्ष दिल्लीच्या संसदेत जातोय, मी ऐका ऐतिहासिक इमारतीत प्रवेश करतोय, माझ्यासोबत देशाचा इतिहास चालतोय, असं वाटायच. पण ती भावना नवीन संसदेत प्रवेश करताना येत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत खासदारच राहणार नाहीत, त्यांच्यासाठी मग नवीन संसदेचा प्रश्न येतोच कुठे?” असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊत यांना आरएच्या गेस्ट हाऊसमध्ये, न्यूझीलंड हाऊसमध्ये ज्या सोयी-सुविधा, एअर कंडिशन मिळतं, तिथे त्यांना गुदमरायला होत नाही. तिथे रशियन फाइल्स चालतात. तस त्यांना नवीन संसदेत वाटणार नाही” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.