सोलापूर : ठाकरे गटाचे युवा नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना मोठा इशारा दिलाय. संदीप देशपांडे यांनी यापुढे ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्यावर टीका केली तर आम्ही थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल करु, असा इशारा शरद कोळी यांनी दिलाय. शरद कोळी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी संदीप देशपांडेंवर सडकून टीका केली. शरद कोळी हे ठाकरे गटाचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या भाषणावर जळगामध्ये बंदी घालण्यात आलेली.
“संदीप देशपांडे यांनी यापुढे ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीका केली तर आम्ही राज ठाकरेंवर टीका करणार. खासदार संजय राऊतांच्या कानाखाली मारण्याचं सोडा, तुम्ही फक्त आमच्या समोर तर येऊन बघा. मग कोण कोणाला कानाखाली मारतं ते कळेल”, असा इशारा शरद कोळी यांनी दिला.
“आमदारकी मिळवण्यासाठी मनसे पक्ष हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर चाटुगिरी करतोय. एक आमदार निवडून आणण्याची औकात नसलेला मनसे पक्ष सत्तेत सामील होण्यासाठी अमित शाहांच्या पुढे पुढे करतोय”, असा घणाघात शरद कोळी यांनी केला. “संदीप देशपांडेंना खुलं चॅलेंज देतो. दम असेल तर आमच्या समोर येऊन बोला. मग कोण कोणाला कानाखाली वाजवतं ते बघू”, असंही ते यावेळी म्हणाले.
“येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी अवस्था मनसेचे झालीय. यापुढे जर संदीप देशपांडे ठाकरे गटाच्या नेत्यांबद्दल बोलला तर आम्ही थेट राज ठाकरेंवरच हल्लाबोल करू”, असा थेट इशारा शरद कोळी यांनी दिला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर संदीप देशपांडे सातत्याने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाला आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप लागू होणार. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटाचा व्हीप पाळणार की आमदारीला लाथ मारणार? असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
याशिवाय ठाकरे गटाला शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह गेल्याची चिंता नाही तर त्यांनी शिवसेनेची मालमत्ता जाण्याची चिंता असल्याचा खोचक टोलाही संदीप देशपांडे यांनी केलाय. संदीप देशपांडे यांच्या टीकेनंतर आता शरद कोळी यांनी इशारा दिलाय.