सोलापूर – सांगलीतल्या जत तालुक्यानंतर आता अक्कलकोटमधल्या काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय. एकूण २८ गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केलाय. महाराष्ट्रातली जत तालुका, त्यानंतर सोलापूर आणि अक्कलकोट आमचं आहे, असा अजब दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलाय. सोलापूरसह संबंध महाराष्ट्रातून बोम्मईंच्या विधानावर टीकेची झोड उठली. मात्र आता जतमधल्या 65 गावांनंतर सोलापुरातल्या 28 मराठी गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय.
महाराष्ट्रातल्याच अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरातल्या 28 गावांमएध्ये कर्नाटक आणि बोम्मईंच्या समर्थनात घोषणा दिल्या जातात. कर्नाटकात जाण्याचा ठराव सुद्धा 28 ग्रामपंचायतींनी मंजूर केलाय. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षात रस्ते-वीज-एसटी न मिळाल्याचा आरोप या गावांचा आहे. त्यामुळे त्यांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केलीय.
या लोकांच्या आरोपांची पाहणी केली. तेव्हा खरोखरच या 28 गावांमध्ये अजूनही एसटी पोहोचलीच नसल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे याच मतदारसंघातून निवडून गेले होते.
पण तरीसुद्धा या गावांच्या समस्या सुटल्या नाहीत. 2019 मध्येही या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला. तेव्हाच्या सरकारनंही दखल घेतली नाही. कर्नाटकात जाण्याचा इशारा देणारे लोक महाराष्ट्रातलीच आहेत.
मात्र जसं मंत्रिमंडळ विस्तार आणि निवडणुकांच्या तोंडावर नेतेमंडळी दबाव टाकते. तेच दबावतंत्र 28 गावांनी अवलंबलंय. त्यामुळे कर्नाटक सरकार सीमेवरच्या मराठी गावांच्या रोषात अजून तेल ओतण्याआधीच महाराष्ट्रानं गावकऱ्यांच्या समस्या निकाली काढायल्या हव्यात.