सोलापूर : करमाळा-टेंभुर्णी राज्य महामार्गावर कंदरजवळ एसटी बस (Bus) व दुचाकी (Two Wheeler)मध्ये अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेंद्र महादेव डोके (20) व रोहन अनिल पाडोळे (19) दोघे रा. कंदर अशी दोघा मयतांची नावे आहेत. राजेंद्र हा सध्या बीएच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आजी,आई-वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे. तर रोहन हा मजुरीचे काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तरुणांच्या अशा आकस्मित जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
करमाळा टेंभुर्णी महामार्गावर कल्याणवरून (करमाळ्याकडून) पंढरपूरला एसटी बस जात होती. तर दुचाकीवरून कंदरहून जेऊरकडे दोघे कामानिमित्त जात होते. दरम्यान कंदर जवळील पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर बस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने बस चालकाच्या विरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरात सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. साजीद खान (25) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी जखमींची नावे आहेत. रावेत परिसरात समीर लॉन्सजवळ हे सर्व कामगार रस्त्यावर पट्टे मारण्याचे काम करत होते. यावेळी एक भरधाव ट्रकने या कामगारांना उडवले. यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य चौघांच्या अंगावर पेंट सांडल्याने ते भाजून गंभीर जखमी झाले. जखमींना उपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून रावेत पोलिस अधिक तपास करत आहेत. (Two youths died on the spot in a bus and two wheeler accident in Solapur)