कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने खास बच्चे कंपनीसाठी पारावरची शाळा भरवली आहे.
विकास काळे असे या उपक्रमशील शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने करमाळा तालुक्यातील केतूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पिंपळाच्या झाडाखाली प्राथमिक शाळा सुरु केली आहे.
त्यांनी सुरु केलेल्या या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे काही ठिकाणी ऑनलाईन शाळा सुरू आहेत. पण आता त्यातील बहुतांश शाळा या बंद आहेत.
तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षकांची प्रत्यक्ष संबंध येत नाही. तर काही ठिकाणी मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा येत आहेत.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आवड ही कमी होत चालली आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे डोळे दुखी होत असल्याच्या तक्रारीही वाढत चालल्या आहे.
या सर्व शिक्षणाचा विपरीत परिणाम लक्षात घेता कोरोनामुक्त झालेल्या केतूरमध्ये विकास काळे यांनी झाडाखालीच शाळा भरवली आहे.
यात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.