Somaiya on Police : पोलीस आयुक्त संजय पांडेंची माफियागिरी सुरू, त्यांच्यावर कारवाई होणारच; सोमय्यांचा इशारा!

| Updated on: Apr 27, 2022 | 11:25 AM

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते.

Somaiya on Police : पोलीस आयुक्त संजय पांडेंची माफियागिरी सुरू, त्यांच्यावर कारवाई होणारच; सोमय्यांचा इशारा!
किरीट सोमय्या, भाजप नेते.
Follow us on

मुंबईः मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते. किरीट सोमय्या हे शनिवारी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी गेले होते. खार पोलीस स्थानकात भेट घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यात एक दगड किरीट सोमय्यांच्या गाडीवर भिरकावला गेला. त्यात किरीट सोमय्यांना जखम झाली होती. त्यावरून सोमय्या आणि भाजप आक्रमक झाला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या फेक एफआयआरबाबत सोमय्या आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

पांडे झोपले होते का?

माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, प्रवीण दरेकरांसह आम्ही आठ जण आज राज्यपालांना भेटायला जात आहोत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे माफियागिरी करत आहेत.  माझ्या गाडीवर दगडफेक लाइव्ह दिसत होती. तेव्हा पांडे झोपले होते. एवढा मोठा एक दगड काच फोडून आत आला. पांडेची इच्छा होती का, त्या दगडाने सोमय्यांचा डोळा, थोबाड फोडले पाहिजे. पांडेंनी जी एफआयार मी साइन केली नाही, ती वांद्रा पोलिसांना दिली. त्यावर खार पोलीस यांनी अॅक्शन सुरू केली. या नकली कारवाईची चौकशी होणार. पांडेंवर कारवाई होणार, असा इशाराही त्यांनी दिला.
अहवाल सांगतो वेगळेच

भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाने दिला आहे. सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नाही, असेही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा अहवाल समोर आला आहे. सोमय्यांना गंभीर इजा नसल्याची माहिती भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला दिसत असणाऱ्या रक्तावरुन नवा वाद होण्याची शक्यता आहे.

राऊत म्हणतात सॉस

संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. एक वेडा माणून ओठाखाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असेल, तर त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले होते. दरम्यान, सोमवारी किरीट सोमय्यांनी आपल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांचीही भेट घेतली होती. नवी दिल्लीत भाजपच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहसचिवांची भेट घेत महाराष्ट्रातील घडामोडींबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या.