मुंबई : भाजप नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरपला आहे. संसदीय कार्यमंत्री असताना विधानसभेत गिरीश बापट यांनी वेळोवेळो सामोपचाराची भूमिका घेत विरोधी पक्षाच्या नेत्याना सहकार्य केले आणि प्रसंगी त्यांचे सहकार्यही घेतले होते. गिरीश बापट म्हणजे आनंदाचा उत्साही झरा होता. त्यांच्यासोबत संवाद साधताना नेहमी हास्याचे फवारे उडायचे. हा अनुभव जसा नेते, पत्रकार यांना यायचा तसाच तो अनेक कार्यक्रमामधून कार्यकर्त्यांनाही यायचा.
कोरोनाचा काळ सुरु होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांच्यासाठी सरकारी अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, पुण्यातील रिक्षा चालकांना एक रुपयाही सरकारी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले.
खासदार बापट यांचे हे आंदोलन सुरु असताना त्यांच्या मागे काही कार्यकर्ते बसले होते. त्यावेळी आणखी एक कार्यकता पुढे आला तो गंमतीने म्हणाला, बापट साहेब, तुमच्या मागे एक कार्यकता बसला आहे. त्याचे शॉर्टफॉर्ममध्ये नाव ईडी असे होते.
त्यावर गिरीश बापट म्हणाले, ईडी बिडीला मी कधी घाबरत नाही. ईडी आमच्याकडे आमच्याकडे काय आहे ? आमच्या खिशात चणे, फुटाणे, शेंगदाणे सापडतील. आमची ईडी म्हणजे आमचे रिक्षा चालक आहेत, असे त्यांनी सांगितले.
असाच एक दुसरा किस्सा आहे पुण्यातच एका कार्यक्रमात गिरीश बापट यांच्या ४० वर्षाच्या राकीय कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सूत्रसंचालकाने भाषणाच्या ओघात जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून गिरीशभाऊंनी समाजकार्य, विकासाचे राजकारण केले. पुण्याचा विकास केला. खऱ्या अर्थाने ते पुण्याचे बाजीराव आहेत असे म्हटले.
हजरजबाबी गिरीश बापट यांनी त्यावर मी पुण्याचा ‘बाजीराव’ तर मग ‘मस्तानी’ कोण ? अस प्रश्न केला. त्यावर त्याने आपण खूप मोठे आहात. आपले काम खुप मोठे आहे. पण, तुमच्या मस्तानीबद्दल मला माहित नाही अशी कोटी केली.
पुण्यात एका शाळेत कार्यक्रम होता. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना बापट यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद परदेशात गेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, भाषणाने एक युवती खूपच प्रभावित झाली होती. विवेकानंद यांना भेटून तिने थेट त्यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल, असे त्या तरुणीने स्वामींना सांगितले. हि गटानं सांगत असताना बापट काही वेळ थांबले आणि पुढे म्हणाले, तो काळ आत्तासारखा नव्हता की चल म्हटले की चालली. त्यांच्या या वाक्यामुळे तेथे एकाच हशा पिकला.
गिरीश बापट यांच्याकडे अन्न व नागरी विकास पुरवठा खाते होते. त्यावेळी पिंपरी येथे एका कार्यक्रमात माजी खासदार गजाजन बाबर यांनी भाषणाच्या ओघात रेशन व्यापारी आणि सरकार हे नवरा – बायकोसारखे असतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, असे म्हटले. त्यावर आपल्या भाषणात बापट यांनी मजेदार विधान केले. ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोंची भांडणं होणारच, असे विधान करून त्यांनी भर कार्यक्रमात हास्यस्फोट घडविला.