नाशिकः सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव 40 हजारांवरून चक्क 95 हजारांवर

| Updated on: Sep 23, 2021 | 2:28 PM

एकीकडे राज्यात सोयाबीनचे दर कोसळत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन ढेपेची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ढेपेचे भाव टनामागे चक्क दुपटीपेक्षा जास्तीने वाढून ते 40 हजारांवरून 95 हजारांवर गेले आहेत.

नाशिकः सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव 40 हजारांवरून चक्क 95 हजारांवर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिकः एकीकडे राज्यात सोयाबीनचे दर कोसळत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन ढेपेची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ढेपेचे भाव टनामागे चक्क दुपटीपेक्षा जास्तीने वाढून ते 40 हजारांवरून 95 हजारांवर गेले आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडलेत. (Soybean Dhep shortage in Nashik; Prices range from Rs 40,000 to Rs 95,000)

भारतात सोयाबीनचा सर्वात जास्त वापर पोल्ट्री खाद्य म्हणून केला जातो. देशातील एकूण उत्पन्नापैकी साठ टक्के सोयाबीन त्यासाठी वापरले जाते. साधरण पंचवीस टक्के सोयाबीनची निर्यात होते, तर पंधरा टक्के सोयबीनवर प्रक्रिया करून त्याचे मानवी खाद्य तयार केले जाते. नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांसाठी दर महिन्याला किमान 40 हजार टन खाद्य लागते. त्यात किमान 10 हजार टन सोयाबीन ढेप असते. कोंबड्यांचे खाद्य म्हणून व्यावसायिक सोयाबीन ढेपेला पसंदी देतात. कारण सोयबीनमध्ये प्रोटीन्स असतात. ते कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक असतात. मात्र, सध्या भाववाढीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांची कोंडी झाली असून, त्यांनी शेंगदाणा आणि सूर्यफूल ढेपेचा पर्याय शोधला आहे. अजून आपल्याकडील सोयाबीन अजून बाजारपेठेत आले नाही. ऑक्टोबरपर्यंत सोयाबीन येईल. त्यानंतर ढेपेचे भाव कमी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे, पण दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर सोयबीन पिकाचे नुकसान होऊ शकते.

डिसेंबरपर्यंत आयातीवर मदार

केंद्र सरकार 30 ऑक्टोबरपर्यंतच परदेशातून सोयाबीन ढेपेची आयात करणार होते. मात्र, देशात सोयाबीनचा तुटवडा जाणवत आहे. अजून खरिपाचे पीक आलेले नाही. त्यामुळे टंचाई वाढू नये यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत सोयाबीन ढेपेची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने पोल्ट्री व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

सोयाबीन डागाळलेले

खरिपाच्या अंतिम टप्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मुगाची काही प्रमाणात काढणी झाली असली तरी मुख्य पीक सोयाबीन हे पाण्यातच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे, पण पदरी पडलेले सोयाबीन अतिरिक्त पावसामुळे डागाळलेले आहे. याचा परिणाम आता सोयाबीनच्या दरावर होऊ लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरुवातीला आवक झालेल्या सोयाबीनला तब्बल 11 हजाराचा दर मिळाला होता. मात्र, आता सोयाबीनची विक्री केवळ 5 हजार रुपये प्रमाणे होत आहे. (Soybean Dhep shortage in Nashik; Prices range from Rs 40,000 to Rs 95,000)

इतर बातम्याः

नाशिकः राज ठाकरेंच्या जंगी स्वागताने पोलीस आयुक्त तापले; कायद्याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

नाशिकः शेतकऱ्यांची लूट करायची इरसाल पद्धत; पठ्ठ्यांनी बाजार समितीच्या वजन काट्यालाच बांधला दगड