मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर वाढत्या अपघाती मृत्यूमुळे परिवहन विभागाने डिसेंबर 2022 ते मे 2023 अशी सहा महिन्यांची विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली होती. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा अपघातांचे प्रमाण 24 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 21 टक्के घटले होते. त्यामुळे याच धर्तीवर आता पुणे-कोल्हापूर महामार्गावर अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी 5 ऑक्टोबरपासून तीन विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आणि मुंबई – पुणे ( राष्ट्रीय महामार्ग क्र.48 ) महामार्गावरही 5 ऑक्टोबरपासून पुन्हा तीन महिन्यांची विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर वेगाच्या नशेमुळे अनेक अपघाती मृत्यू होत असल्याने परिवहन विभागाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यांपासून सहा महिन्यांची विशेष तपासणी मोहीम राबविली होती. आता पुन्हा तिन्ही मार्गांवर ही मोहिम सुरु झाली आहे. यासाठी एका तपासणी पथकात किमान 2 मोटार वाहन निरीक्षक आणि 2 सहायक मोटार वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी नेमले आहेत. ही तपासणी पथके विविध पाळ्यांमध्ये महामार्गांवर तपासणी करणार आहेत. या मोहिमेत वेग मर्यादेचे उल्लंघन करुन धावणारी वाहने, चुकीच्या मार्गिकेतून जाणारी तसेच मार्गिका बदलणारी वाहने, विना सीटबेल्ट जाणारी वाहने, रस्त्याच्या कडेला अवैध पार्कींग, उतारावर न्युट्रल गेअरमध्ये चालणारी अवजड वाहने यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
या तपासणी मोहीमेत महामार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रांना ( ब्लॅक स्पॉट ) वारंवार भेटी देणे, ब्लॅक स्पॉटमधील त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करणे, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानूसार वायुवेग पथकांनी कामगिरी करणे, तसेच दर सोमवारी आठवडाभराच्या कामगिरीचा परिवहन उपायुक्त ( रस्ता सुरक्षा ) मार्फत परिवहन आयुक्त आढावा घेणार आहेत. यावेळी पब्लिक एड्रेस सिस्टीमद्वारे चालकांचे प्रबोधन करणे त्यांचे समुदेशन करणे त्यांना सूचना देणे अशा प्रकारे मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेवर देखरेख ठेवण्यासाठी पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.