स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीने रणशिंग फुंकलं, धनंजय मुंडेंऐवजी नव्या नेत्याकडे औरंगाबादची जबाबदारी

| Updated on: Dec 25, 2020 | 4:16 PM

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad Municipal Corporation elections 2021) सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.

स्पेशल रिपोर्ट : राष्ट्रवादीने रणशिंग फुंकलं, धनंजय मुंडेंऐवजी नव्या नेत्याकडे औरंगाबादची जबाबदारी
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad Municipal Corporation elections 2021) सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि मनसेने संभाजीनगरचा मुद्दा उकरून काढून त्यावर राजकारण करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाची बांधणी करून पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना बदलून आता पक्षाने राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे औरंगाबादची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक (Aurangabad Municipal Corporation elections 2021) तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच औरंगाबाद महापालिकेमध्ये आपली ताकद असावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी निवडणुका लढवल्या जायच्या. मात्र या वेळी पक्षाकडून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. राज्यात त्यांची एक वेगळी छबी निर्माण झालेली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे यावेळी त्यांच्यावर औरंगाबादची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं. त्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी राज्यभर प्रचार केला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे बॅकफूटवर आहेत. दुसरीकडे राजेश टोपे यांनी आपल्या कामाची चमक दाखवत स्वतःला सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजेश टोपे यांच्या कामाचा त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्याचा उपयोग करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जबाबदारी दिलेली आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक म्हटलं की राज्यातल्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ होत असतातच धनंजय मुंडे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुख पदावरून गच्छंती होणे ही त्यातलीच एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. ज्या धनंजय मुंडे यांच्या तडाखेबंद भाषणांनी मतदारांना आकर्षित केले जायचं त्याच धनंजय मुंडे यांना या वेळेला औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमातून डावलण्यात आल्यामुळे सगळ्यांचे डोळे विस्फारलेले आहेत.

औरंगाबादसह चार बड्या महापालिकांची फेब्रुवारीत निवडणूक

रोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.

संबंधित बातम्या : 

मुंडेंची गच्छंती, टोपे नवे संपर्कप्रमुख! औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : सध्याचं पक्षीय बलाबल काय सांगतं?