मुंबई : दहावी-बारावीच्या (SSC exam) परीक्षेवेळी बऱ्याचदा परीक्षा केंद्रांजवळ झेरॉक्सचे दुकानांवर (Xerox Shops) आपण नेहमी गर्दी पाहतो. अर्थात त्या दुकानांवर कॉपीच्या हेतून विद्यार्थ्यांकडून झेरॉक्स काढले जातात असंही नाहीय. पण काही विद्यार्थी कॉपी करण्याच्या हेतून झेरॉक्स करतात हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून दहावी-बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जातेय. याशिवाय राज्य शिक्षण मंडळाने यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्राजवळ असणारे झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आले असून या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. याची माहिती आज पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली .
येणाऱ्या शालांत परीक्षा ह्या कॉपीमुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे तहसीलदार स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर कर्मचारी यांची फिरती पथक तैनात करण्यात आली आहेत .
तालुका स्तरावरील अधिकारी या सर्व परीक्षा केंद्रांवर जाऊन या सगळ्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन केला जाईल, असं आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.
या परीक्षा केंद्रांवर मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन जाण्याची प्रतिबंध लावण्यात आल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, दहावीच्या परिक्षेत पेपर सोडवण्याचा वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी पालकांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
गेली दोन वर्ष कोरोना काळात ऑनलाईन परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेचा सराव राहिला नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सराव परिक्षेत दिसून आलाय. गुणांची टक्केवारी कमालीची घसरत आहे, असं पालकांचं म्हणण आहे.
परिक्षा केंद्रावर मोबाईल दिसल्यास केंद्र प्रमुखावर कठोर कारवाई होणार आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्हा कॉपीमुक्त ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील संकल्प केलाय.
दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मास कॉपी झाल्यास केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आलाय. याबाबत नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.
परिक्षेत तालुकास्तरावर संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. जिल्हा स्तरावरून स्वतः जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक तैनात असतील, असं स्पष्ट करण्यात आलंय.