मुंबईः राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे अखेर गुरुवारी स्पष्ट झाले. मुंबईतल्या आझाद मैदानातून आंदोलनातून काढता पाय घेत असल्याची घोषणा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर तात्काळ काही मिनिटांध्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. या दोघांनाही आंदोलनातून आझाद केले आहे. आता विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
नेतृत्व सदावर्तेंकडे
आझाद मैदानावर सुरू असलेले एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर चिघळले असून, त्यात दुही माजल्याचेही गुरुवारी स्पष्ट झाले. राज्य सरकारने एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत पगार केल्याची घोषणा केली. त्यामुळे या आंदोलनाचे सुरुवातीपासून नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांना पाठिंबा असेल. आमची भूमिक वेगळी आहे. आंदोलन पुढे कसे न्यायचे, त्याची रणनीती सारे काही वेगळे असते म्हणत तलवार म्यान करण्याचे संकेत दिले. त्यानंतर तात्काळ या आंदोलनाचे नेतृत्व आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.
काय म्हणाले सदावर्ते?
सदावर्ते यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सुरुवातीलाच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा तुम्ही काय ते समजून घ्या. त्यांना सरकारने आपल्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. या खोत आणि पडळकरांना आम्ही आंदोलनातून आझाद केले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
70 वर्षानंतर अभूतपूर्व लढा
सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे. हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही. कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 70 वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली. आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
इन्स्टिट्यूशनल मर्डर
सदावर्ते म्हणाले की, आजापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर आहेत. आमचे मित्र संजय राऊत लेखनी चालवतात. त्यांनी एकदा तरी आपल्या रोखठोकमधून या संपाच्या बाजूने लिहावे, असे आवाहन त्यांनी केले. राऊत यांनी आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेऊ नये, हे लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.