मुंबई : मोठ्या पगारवाढीनंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत, कामावर हजर झाले, माात्र काही कर्मचारी विलीकरणावर ठाम राहत संपावर आहेत. त्यामुळे एसटीचा संप चिघळला आणि दगडफेकीच्या घटना वाढल्या. तर दुसरीकडे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबतही राज्य सरकार विचार करत आहे. त्यावरून अनिल परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर इशाराही दिला आहे.
मेस्माचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होणार
काही दिवसांपूर्वीच संप मागे घ्या अन्यथा कठोर करवाई करू असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. तर मेस्माचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबाबत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. मेस्माबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांचा सल्ला परिवहनमंत्री घेणार आहेत. मेस्मा लावल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात याबाबतही चर्चा होणार आहे.
जवळपास 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन
आतापर्यंत तब्बल 10 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तब्बल 2 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावं लागतंय, दुसरीकडे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागत आहे.
35 दिवसांनंतर धावलेल्या एसटीवर दगडफेक
हिगोलीत 35 दिवसांनंतर कळमनुरी अगरातल्या एका बसचे टायर फिरले. कळमनुरी अगरातून पहिली बस परभणीकडे रवाना झाली. मात्र काही वेळातच ह्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. कऱ्हाळे डिग्रस पाटी शिवारात अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर तिकडे नागपुरात अगारातून आज दोन बस बाहेर पडल्या. यावेळी दगडफेकीच्या घटना पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. याआधीही राज्यात अनेक ठिकाणी दगडफेचीच्या घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त दगडफेकीच्या घटना ह्या नगरमध्ये घडल्या आहेत. भिवंडी एसटी अगरातून पहिली बस कल्याणकडे रवाना झाली. काही ठिकाणी तब्बल 35 दिवसांनी लालपरी रस्त्यावर दिसल्याने सर्वसामान्य आनंदीत पहायला मिळाले.