संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, धारशीव : राज्यात सध्या महाराष्ट्र शासनाच्या बसची ( ST BUS ) अवस्था बिकट असल्याने नुकतेच एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर याच एसटी बसची म्हणजेच लालपरी अवस्था बिकट झाली आहे. अनेक बसला टायर नाही तर काही बसच्या सीटची अवस्थाही दयनीय आहे. काही बस तर कालबाह्य झाल्या आहेत. रस्त्यात बस बंद पडणे, आग लागणे यांसह विविध प्रकारचा बसमध्ये खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, याच काळात राज्यातील ( Maharashtra News ) बसवर लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय ठरत आहे. निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान अशा आशयाची जाहिरात यावर लावण्यात आल्याने राज्य शासनाच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.
धाराशीवमधील बस आगरात असलेल्या बसची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. बसला चाक नसल्याने बस एका जागेवर उभी आहेत. बसमध्ये असलेल्या सीटची अवस्थाही खराब झाली आहे. इतकंच काय रंगकाम देखील नसल्याने बसची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे
धाराशीव येथीलच नाहीतर संपूर्ण राज्यातील बसची अशीच अवस्था आहे. बसचे होणारे अपघातला हीच कारणं असल्याचे बोलले जात आहे. बसमध्ये सुधारणा व्हावी अशी नेहमीच प्रवासी ओरड करतात. मात्र, शासन एकीकडे जाहिरातीवर खर्च करत असून एसटीची देखभाल करत नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोच्या काही जाहिराती केल्या जात आहे. त्यावर विविध मजकूर असल्याने त्यावरूनच नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.
अशाच स्वरूपाची एक जाहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान अशा स्वरूपाचा मजकूर असून बसची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्या बस मध्ये कुणालाही बसून प्रवास करावा वाटणार नाही अशा स्थितीत काही बस आहे.
त्यामुळे जाहिराती करण्या अगोदर जर सरकारने बसची परिस्थिती बदलली असती तर चांगलं झालं असतं अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार याबाबत दखल घेऊन कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नुकतीच धाराशीव येथे यावरून निलंबन करण्यात आले आहे.
त्यामुळे निलंबन करण्या ऐवजी बसची परिस्थिती बदलली असती तर सरकारवर टीका झाली नसती असेही अनेक प्रवासी खाजगीत बोलत आहे.