मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना न्यायालयाने जामिनावर सोडले असले तरी हे वादळ अद्याप शांत झालेले नाही. या प्रकरणावरुन राज्य सरकारला भाजप लक्ष्य करत आहे. तसेच पोलिसांवर दबाव असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असा आरोपही भाजपकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राज्य पोलीस दलाची पाठराखण केली आहे. पोलिसांनी त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देसाई यांनी म्हटलंय. (State Minister Shambhuraj Desai defended police appreciate them in Narayan Rane arrest case said police did their job)
“पोलिसांनी जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. सर्व त्या पद्धतीने दक्ष देत आहोत. महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना नागरिकांना या गोष्टीचा कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल, असे संभूराज देसाई म्हणाले. तसेच काही मंडळी जाणीपूर्वक या प्रकरणाला वेगळे वळण लावायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तसं करू नये, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांना नारायण राणेंच्या अटकेवर भाष्य केले. नारायण राणे यांच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने दोन-तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर गुन्हे दाखल झाले. दाखल गुन्ह्याच्या आधारावरच तसेच कलमांतर्गत पोलिसांनी कारवाई केली, असे देसाई म्हणाले. तसेच माननीय न्यायालयाला जामीन देण्याचा आधिकार आहे. त्यानुसार राणे यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्यासाठी काही अटी-शर्ती देखील घातल्या आहेत. ही कायद्याची प्रक्रिया आहे, असेदेखील देसाई म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आणि जामीन प्रकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. राज्यात यवतमाळनंतर आता नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी हे तक्रार अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय, सायबर पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. यातील दोन तक्रार अर्ज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तर एक तक्रार अर्ज सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज
‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा जोरदार टोला
(State Minister Shambhuraj Desai defended police appreciate them in Narayan Rane arrest case said police did their job)