नाशिकः राज्यातील 18 महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची (Shiv Sena) संघटना असलेली युवासेना सक्रिय झाली आहे. त्यासाठी येत्या 8 व 9 जानेवारी रोजी नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाला राज्यभरातून 2 हजार पदाधिकारी, शिवसेनेचे अनेक मंत्री, नेते हजेरी लावणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समारोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार आहेत. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आढावा घेतला.
हे दिग्गज येणार…
युवासेनेच्या अधिवेशनाला युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आणि खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी आदी दिग्गज हजेरी लावणार आहेत. 8 जानेवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. समारोप संजय राऊत हे करणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उदघाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत, तर अधिवेशनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने होणार आहे.
तयारीचा घेतला आढावा
युवासेनेच्या अधिवेशनाच्या तयारीचा वरुण देसाई यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका आहेत. हे पाहता युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. ती पार पडण्यासाठी कार्यकर्ते किती तयार आहे, याची चाचपणी या अधिवेशन काळात केली जाणार आहे. या मेळाव्यास राज्यभरातून दोन हजार पदाधिकारी येतील, अशी माहिती त्यांनी दिली. देसाई यांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली.
कोरोनाच्या नियमांचे काय?
कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नाशिकमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. अनेक निर्बंध सरकारने पुन्हा लागू केले आहेत. मात्र, युवासेनेच्या अधिवेशनाला राज्यभरातून 2 हजार कार्यकर्ते जमा होणार आहेत. या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन केले जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे अधिवेशन तयारीच्या आढाव्यालाच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. इतर नियमांचेही पालन दिसले नाही. मग गर्दी जमवू नका, नियमांचे पालन करा, हे नियम फक्त सामान्या नागरिकांच्या कार्यक्रमाला का, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिवभोजन केंद्राचं अनुदान 5 महिन्यांपासून अडकलं; ठाकरे सरकारची महत्त्वाची योजना बंद पडण्याच्या दिशेनं