नवी दिल्ली : ऊस FRP च्या मुद्द्यावरुन शेतकरी संघटना आणि शेतकरी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील कृषीभवनामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची ऊस FRP संदर्भात महत्वपुर्ण बैठक झाली. या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्यासमोर राज्यातील स्थिती मांडली. त्यावेळी पियुष गोयल यांनी मोठं आणि महत्वपूर्ण आश्वासन दिलंय. (Sugarcane FRP amount will be lump sum to farmers)
राज्यामध्ये काही संघटना जाणीवपूर्वक केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. यावेळी पियुष गोयल यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही ऊसाच्या एफआरपीचे तुकडे करणार नाही आणि तशाप्रकारचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही. शुगर केन ऑर्डर ऍक्ट 1966 नुसार शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गेल्यावर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील. केंद्र सरकार एफआरपीमध्ये कोणताही बदल करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठक संपताच अश्या पध्दतीचे पत्र गोयल यांनी सदाभाऊ खोत यांच्या शिष्टमंडळाला दिले, तसेच एक पत्र राज्य शासनाला देखील दिले आहे.
या बैठकीस वाणिज्य विभागाचे जॉईंट सेक्रेटरी सुबोध कुमार देखील उपस्थित होते. तसेच या शिष्टमंडळामध्ये खासदार उन्मेशजी पाटील, खासदार सुनील मेंढे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा.एन.डी.चौगुले इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे तसेच याविषयी केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवुन ही बैठक तात्काळ घडवुन आणल्याबद्दल माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे सदाभाऊ खोत यांनी आभार मानले.
मी साखर कारखानदार नाही. तुमचे मत असेल तर मी त्यासाठी आग्रह धरेन. उसाला एक रकमी रक्कम द्या असा एक शब्द निघालाय. ऊस गेला की रक्कम द्या अस म्हणतात. ऊस घातला की साखर तयार झाली आणि ती विकली जाते असे होत नाही. कारखान्यात वर्षानुवर्षे साखर पडून राहते. गुजरातमध्ये पहिला, दुसरा, तिसरा हप्ता केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. एक रकमीमध्ये शेतकऱ्यांचे हित किती हे पाहिले पाहिजे, असं शरद पवार सोलापुरात बोलताना म्हणाले.
ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपूर्वी सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केली.
इतर बातम्या :
Ajit Pawar IT Raids : अजित पवार आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाचं धाडसत्र, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर
Sugarcane FRP amount will be lump sum to farmers