माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देखमुख यांच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जयश्री थोरात यांच्यासह कार्यकर्त्यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. अशात वसंतराव देशमुख यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. पण घडलेल्या घटनेनंतर संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. थोरात आणि विखे कार्यकर्त्यांकडून वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी घडलेल्या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे. धांदरफळ येथे आमच्या महायुतीची परिवर्तन मेळावा होता. त्याठिकाणी असलेले गृहस्थ… ज्यांचा टीव्हीमध्ये उल्लेख होत आहे ते वसंतराव देशमुख हे त्या गावतील आणि गटाचे रहिवासी असल्यामुळे भाजप किंवा कोणत्या पक्षाचे नव्हे पण स्थानिक आमदारांचे परंपरागत विरोधक असल्यामुळे ते स्टेजवर होते. माझं भाषण संपल्यानंतर मी युवकांमध्ये फोटो काढत होतो. तेव्हा स्टेजवर गोंधळ सुरु झाला आणि मी काय झालं मी विचारलं.
पुढे सुजय विखे म्हणाले, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करणार होता. पण तेवढ्यात जाळपोळ सुरु झाली. रस्त्यावर पूर्ण मॉब गोळा करून महायुतीच्या जेवढ्या गाड्या आल्या होत्या, तेवढ्या गाड्या तोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या. गाड्यांमध्ये महिला बसल्या होत्या. महिलांना गाडी खाली उतरवून गाडी फोडली. अशा घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्या वक्तव्याचं निषेध करतो. पोलीस प्रशासनाने वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी. पण त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, ज्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे… असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
सभेत वसंतराव देशमुख म्हणाले, ‘भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही तुला सुद्धा पोरं कशी झाली? आपल्या कन्येला समजवा… नाही तर आम्ही निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही.’
‘सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत…’असं वसंतराव देशमुख म्हणालेत.