Baramati loksabha : बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही प्रतिस्पर्धींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरण्याच्याआधी दोघांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही झालं. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजय शिवतारे यांच्यासह दिग्गज नेते हजर होते. तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात एकाच मंचावर होते. बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत आहे. मात्र अजित पवार यांनी बारामतीची लढाई भावकीची नसून, काही जण भावनिक करत असल्याचा थेट निशाणा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लगावल आहे.
सुनेत्रा पवारांच्या मंचावर, शरद पवारांच्या बाहेरच्या पवार या वक्तव्यावरुनही आवाज घुमला. फडणवीसांनी बारामतीच्या मनामनातील सूनबाई असा उल्लेख केला. तर निलम गोऱ्हेंनी सूनबाईला पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत, असा टोला लगावला.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा सामना शरद पवारांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंशी आहे. मात्र महायुतीसाठीही बारामतीची लढत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही पूर्ण ताकद लावली आहे.
इकडे सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर शाब्दिक आक्रमण केलं. काही जणांना फोन करुन घाबरवलं जात आहेत. अशांना माझा नंबर द्या, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं आहे. तर अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावरुन चांगलाच समाचार घेतला. सत्तेची एवढी मस्ती आली का ?…निधी तुमच्या खिशातला नाही, असा हल्लाबोल कोल्हेंनी केला आहे.
अमोल कोल्हेंसह जयंत पाटलांनीही अजित पवारांवर तुटून पडण्याची संधी सोडली नाही. द्रौपदीच्या वक्तव्याचा दाखला देत, अजित पवारांचा बॅलेंस जात असल्याचा टोला जयंतरावांनी लगावला.
उमेदवारी अर्ज भरतानाच महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शाब्दिक तोफा धडाडल्यात. बारामतीसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान आहे. त्याआधी प्रचार आणखी रंगात येईल.