बारामती, पुणे | 13 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणूक भाजप आणि काँग्रेसने उमेदवारी याद्या जाहीर करणे सुरु केले आहे. परंतु महाराष्ट्रात जागा वाटप रखडल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे अधिकृतपणे एकही उमेदवार जाहीर केले नाही. परंतु बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत रंगणार आहे. या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रचारही सुरु केला आहे. स्वत: शरद पवार तळ ठोकून थांबले आहे. राजकीय वैर विसरुन जुन्या लोकांच्या भेटी घेत आहेत. त्याचवेळी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या महाविजयाचे बॅनर लागले आहे. ‘निर्धार महाविजयाचा’ या बॅनरची बारामतीमध्ये चर्चा सुरु आहे.
बारामती शहरातील सिटी इन चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा एक आगळावेगळा फलक लागला आहे. या फलकावर निर्धार महाविजयाचा असा संदेश नमूद करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणुक लढवतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सागर काटे या कार्यकर्त्याने लावलेला हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
बारामतीमध्ये मंगळवारी सुनेत्रा पवार यांचा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले. त्या म्हणाल्या, दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे. तुमची साथ आवश्यक तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे.
बारामती येथे छत्रपती शिवाजीनगर येथील महिला ग्रुपच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावलीय. कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.