महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता 3 दिवस झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी निकालाआधी कोण मुख्यमंत्री बनेल, सरकार कधी स्थापन करायचं? याबाबत ठरवत होते. पण निकाल अतिशय वेगळा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या निकालावर संशय निर्माण करत आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आल्याने आपल्या सर्वाधिक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा केला जातोय. या दरम्यान डॉ. के.ए पॉल यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.
सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, या याचिकेचे याचिकाकर्ता डॉ. के.ए पॉल आणि महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नसल्याची माहिती समोर येत आहे. महााविकास आघाडीकडून ईव्हीएमबाबत केवळ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. “ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुण्यातील एका मतदारसंघात एकूण मतदान हे 3,65,000 इतकं झालं आहे. पण मतमोजणी 3,74,547 इतकी झाली आहे. याचाच अर्थ 9 हजार पेक्षा जास्त मतदानापेक्षा मतमोजणी झाली आहे. जे मतदान केंद्रात मतदानासाठी गेलेच नाहीत तर त्यांचे हे 9 हजार मतं कुठून आली? याचा अर्थ हे मॅनूप्लेशन आहे. हे 10 हजार मतं आली कुठून?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “मी महाविकास आघाडी किंवा राजकीय पक्ष पाहत नाही. पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतोय की, महाराष्ट्रात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. जी मतं दिलेलीच नाहीत ती मतं आली कुठून?”, असा सवाल त्यांनी केला.