मुंबई : कन्नडिंगाच्या उन्मादाचे पडसाद लोकसभेतही उमटले. महाराष्ट्र तोडण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला. आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोलही सुनावले. मात्र लोकसभेत महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांनी आपल्याला साथ दिली नसल्याचा आरोपही सुळेंनी केलाय. सीमा प्रश्नावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत चांगल्याच आक्रमक झाल्या. आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सुनावलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची चिथावणी आणि कन्नडिंगाच्या उन्मादानंतर, सीमावादाचे पडसाद लोकसभेतही उमटलेत. सुप्रिया सुळेंनी तर, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. यानंतर सुळे आणि कर्नाटकातील हवेरी मतदारसंघाचे भाजपचे खासदार शिवकुमार उदासी यांच्यात खडाजंगी सुरु झाली.
सुप्रीम कोर्टात प्रकरण असतानाही बोम्मईंच्या धमक्या आणि कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी थांबवा, अशी मागणी सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केली. पण लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्लांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. दोन राज्यांच्या प्रश्नात केंद्र सरकार काय करणार ? असं ओम बिर्ला म्हणालेत.
सीमावादाच्या प्रश्नावरुन, कन्नडिगांचा ज्याप्रमाणं उन्माद सुरु आहे त्यावरुन त्यांना हिंसक वळण द्यायचं आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळं केंद्र सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करुन लक्ष घालावं, अशी मागणी शरद पवारांनीही केलीय. तर राज ठाकरेंनीही पत्र लिहून केंद्राला मागणी केलीय.
बेळगावात कन्नडिगांनी महाराष्ट्राच्या गाड्या फोडून उच्छाद मांडल्यानंतर, हे प्रकरण आता अमित शाहांपर्यंत पोहोचलंय.
फडणवीसांनी अमित शाहांना फोन करुन बेळगावातील मराठी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळं केंद्राकडून लक्ष घातलं जाईल अशी अपेक्षा!