‘भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं’, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 14, 2024 | 4:22 PM

सुप्रिया सुळे यांनी आज धाराशिवमध्ये आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं आहे. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
अजित पवार आणि सुप्रिया सुळे
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. “माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते. डिसेंबरमध्ये लाडकी बहीणच्या लिस्टची स्क्रूटीनी होणार हे कोणाला माहिती होते का हो? मला तर ते माहिती नव्हते. मग यांना कसे कळले?”, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.

‘खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे’

“महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर घरी येऊन पैसे देईन. मतदान आणि स्कीमचा काहीही संबंध नाही. भाऊ बहिणीच्या नात्याला पंधराशे रुपयांची किंमत लावली आहे. मी भावाने मागितले असते तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं. वर जाताना काय घेऊन जाणार? ‘खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे’. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बहिणीला ओवाळणी देणार. अहो देवेंद्रजी तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देताय का?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “जीएसटी घेता, टॅक्स घेता, खत, तांदुळ, हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स घेता, खिश्यातून घेता का?”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘ते जळगावात चिडून चिडून भाषण करत होते’

“दोन आमदारांच्या वक्तव्यानंतर सरकारमधील नेते चिडले होते. त्यामुळे ते जळगावात चिडून चिडून भाषण करत होते. याचा अर्थ यात काहीतरी गोलमाल आहे. लाडकी बहीण योजनेला निधी कुठून आणतात? काही पत्रकार म्हणाले DPDC चा निधी लाडकी बहीणला दिला जातोय. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करावे. ते अनेकवर्षे अर्थमंत्री होते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आपला पक्ष फुटलेला नाही, तर तो हिसकावून नेलेला आहे. काल सुप्रीम कोर्टाने मोबदला देण्यावरून सरकारला झापले आहे. जमिनीचा मोबदला न दिल्याने तुमच्या सगळ्या स्कीम बंद करून टाकू, असं कोर्टाने म्हटले. हे जुमलाबाज सरकार आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.