बारामती लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदान होत आहे. या मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्यातील या लढतीमुळे बारामतीची चर्चा देशात होत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी मोर्चा बांधणी केली आहे. त्यातच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी काठेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. मी माझ्या काकींच्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले. आता त्यांच्या या भेटीवरुन राजकारण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे भावनिक खेळ करत असल्याचा आरोप केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या आईची भेट घेतली? त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रिया सुळे आता भावनिक खेळ करत आहेत. त्यांचा भावनिक स्ट्रॅटेजीचा भाग हा भाग आहे. शेवटी ते एकमेकांचे शत्रू नाहीत, बहीण -भाऊ आहेत, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अजितदादा यांनी ‘मेरे पास माँ हैं’ असे वक्तव्य केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार कुटुंबात एकटे पडले आहे, असे चित्र जाणीवपूर्वक तयार केले गेले आहे. या पार्श्वभूमीवर आई पाठीशी असणे, तिचा आशीर्वाद मिळणे, यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते. अजितदादा एकटे पडलेत हे चित्र दाखवलं जात असताना आई पाठिशी असल्याचे चित्र खूप चांगलं आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ते कुणाला भेटून आलेत याची चौकशी करायला हवी. आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत, परंतु ते अजमल कसाबसोबत आहेत, असे फडणवीस यांनी सांगताना वडेट्टीवार जे बोलले त्याच्याशी ठाकरे सहमत आहेत का? आता मतांच्या लांगूलचालनसाठी ते गप्पा आहेत का ? मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार आहेत, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी केले.