राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
शिवराज सिंह चौहान हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे डेटा होता म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना चांगली राबवली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावर मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आम्ही पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांना कांदा, साखर यासंदर्भात सांगितले. शेतकरी अडचणीत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी पॉलिसी करताना जुमलेबाजी करु नका. कांदा निर्यात बंदी केली त्याचा परिणाम दिसून आला. आधीचे मोदी सरकार आणि आताचे एनडीए सरकार लोकांनी नाकारले आहे. 118 कोटीचा घोटाळा कृषी खात्यात झाला आहे, हे मी नाही बोलत आहे, हा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सुरक्षा संघाने केला आहे. सरकारने चुकीची कृषी धोरण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. मात्र उद्योजकांचे कर्जमाफी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, अजित पवारांवर जे भष्ट्राचाराचे आरोप झाले, त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. हे पहिल्या दिवसांपासून दिसत आहे.
संभाजी भिडे यांनी साड्या न घालणाऱ्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करु नये, असे वक्तव्य केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संभाजी भिडे यांच्यावर कठोर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला जात आहे. संभाजी भिडे आणि त्यांच्या लोकांकडून हे केला जात आहे, हे दुर्दैव आहे.