मुंबईः काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्यांवर अखेर पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत एक कार्यक्रम झाला. यावेळी त्यांना या राजकीय जबाबदारीचे पत्र देण्यात आले. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कोणती जबाबादारी दिली?
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत एक कार्यक्रम झाला. यावेळी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी त्या निवडीचे पत्रही यावेळी पुणेकर यांना दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
लावणीला मानाचे स्थान
सुरेखा पुणेकर यांनी 16 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर अनेक कलाकारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. सुरेखा पुणेकर यांनी लावणीला महाराष्ट्रासह परदेशातही मानाचे स्थान मिळवून दिले आहे. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी पायात घुंगरू बांधले आणि लावणी कार्यक्रमांना सुरुवात केली. नटरंगी नार हा त्यांचा कार्यक्रम राज्यभरात सगळीकडे गाजला. या रावजी तुम्ही बसा भावजी , पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, कारभारी दमानं या त्यांच्या लावण्या खूप गाजल्या आहेत. 2019 ला पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. तर बिग बॉस या स्पर्धेतही त्या सहभागी झाल्या होत्या.
कामातून उत्तर देणार
सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती. यावेळी चांगलेच राजकीय वातावरण तापले. आता या टीकेला कामातून उत्तर द्यायची संधी पक्षाने पुणेकर यांना दिली आहे.