लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. महायुतीतर्फे उमेदवारांच्या नावाची घोषणा केली गेली. मात्र असे असले तरी कल्यामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल यावर कित्येक दिवस पडदाच होता. विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदावरी मिळणार अशी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना आशा पण भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र ही जागा आपल्याला मिळावी अशी इच्छा होती. अखेर आज या जागेवरील पडदा उठला असून कल्याणमधील सस्पेन्स संपला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे कल्याणमध्ये आता महायुतीचे श्रीकांत शिंदे वि. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर असा सामना रंगणार आहे.
शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट
दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याने गटावर निशाणा साधत टीकास्त्र सोडले. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा त्यांच्या वडिलांनी करण्याऐवजी भाजपच्या फडवणीसांनी करावी यातून शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट होते, असे म्हणत अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली. त्यापुढे त्यांनी Lol असे लिहीत खोचक हास्यही केले.
काय म्हटले सुषमा अंधारे यांनी
‘ श्रीकांत शिंदे हे एकनाथभाऊंचे चिरंजीव म्हणून आस्था, आपुलकी आहे. पण त्यांची उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी/डुप्लिकेट पक्षप्रमुखांनी जाहीर करण्याच्या ऐवजी फडणवीसांनी जाहीर करावी यातून शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट होते’, असे ट्विट अंधारे यांनी केले.
श्रीकांत शिंदे हे एकनाथभाऊंचे चिरंजीव म्हणून आस्था, आपुलकी आहे. पण त्यांची उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी/डुप्लिकेट पक्षप्रमुखांनी जाहीर करण्याच्या ऐवजी फडणवीसांनी जाहीर करावी यातून शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात आहे हे स्पष्ट होते. Lol@ShivSenaUBT_
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 6, 2024
श्रीकांत शिंदेंचे चिन्ह धनुष्यबाण की कमळ?, वैशाली दरेकरांचा खोचक सवाल
कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरकेर यांचीही उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची लढत थेट श्रीकांत शिंदे यांच्याशी होईल. उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरकेर यांनीही प्रचाराचा धडाका लावला असून आज कल्याणमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही टीका केली.
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली हे ऐकून मला आनंद झाला. मात्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणीस यांनी जाहीर केल्याने त्यांचे चिन्ह कमळ की धनुष्यबाण असेल याची मला शंका आहे, असा सवाल त्यांनी केला. नेमकं ते कुठल्या चिन्हावर लढणार ? त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतात, त्यामुळे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे असे दरेकर म्हणाल्या.