शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज खेडमध्ये प्रचारसभेत विरोधकांवर सडकून टीका केली. “विरोधकांमध्ये खूप किडे आहेत. केव्हा कोणता किडा वळवळ करेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना सांगावं लागतं की आम्ही तुकोबारायांचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे पाईक आहोत. त्यामुळे ठकाशी महाठक व्हावं हे आम्हाला माहिती आहे”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “काही लोक मला म्हणाली दिलीप मोहिते म्हटले होते पाठीमागच्या वेळेस शेवटची निवडणूक आहे. आता ते यावेळी मंत्री होणार असे सांगितले जाते. अजित दादा त्यांना मंत्री करणार आहेत. दिलीप मोहिते पाटील अजित दादांवर भरोसा ठेवतात. ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याच अजित दादांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात लोकसभेला बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित दादा कसा भरोसा करायचा मग?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
“ज्यांनी सख्या काकाचा विश्वासघात करून टाकला त्या अजित दादांनी दिलीप मोहिते यांना मंत्रीपदाचा शब्द दिला. आपली ही पिढी आहे तिने खूप गोष्टी पाहिल्या आहेत. भूकंप, कोरोना, चिकनगुनिया, वादळ आपण पाहिली आणि आपण पहाटेचा शपथविधी पाहिला. आपली पिढी इतकी भारी आहे हे इथे कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. जिथे तलाठी लवकर येत नाही तिथे राज्यपाल पहाटे आला”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
“ही निवडणूक कोणा एकाला आमदार करायचं म्हणून महत्त्वाची नाही. ही निवडणूक पुन्हा एकाला मंत्री होऊ द्यायचं किंवा मंत्री नाही होऊ द्यायचं एवढ्यासाठी नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण की मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या उडून गेल्या. कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“अडीच वर्षात सरकार बदललं तर फेसबुक लाईव्ह करून खून केले जातात. अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. वाय दर्जाची सुरक्षा असताना माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांना जर मारलं जात असेल तर आपली काय बात आहे? कुठं आहे कायदा? पोलिसांचा धाक राहिला नाही. कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो. कोकणातून आलेल्या चिल्लर चाराने त्यांनी पोलिसांवरती बोलायचं? पोलिसांना धमक्या दिल्या जातात. आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे. नारायण भाऊंचा पत्ता तर कणकवली आहे. सागर बंगला तर देवा भाऊंचा आहे. काय लोकेश बापाचं सुद्धा विसर पडतोय”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“पोलिसांचा अपमान करण्याचे काम यांनी केलं. या देशातील सर्वात मोठा कायदा ही वर्दी आहे आणि याचा मानसन्मान जर या पक्षाचे लोक ठेवू शकत नाही तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. महिलांना पंधराशे टिकल्या देऊन भुलवायला पाहत आहेत. पंधराशे टिकल्यांच्या जाहिरातीसाठी लाखो रुपयांचा बॅनर लावला जातो. यातून महिलांची इज्जत काढली जाते. गरिबीची टिंगल केली जाते. अपमान केला जातोय”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
“शेतकऱ्यांना कर्जातून तीन लाखांची सवलत आणि एक रुपयांमध्ये विमा म्हणत ही फसवणूक केली जात आहे. शाळेची परिस्थिती खराब झाली असून शिक्षणाचा खर्च परवडत नाही. एका मुलाला वर्षाला लाख ते दोन लाख रुपये खर्च लागतोय. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाणार”, अशी घोषणा सुषमा अंधारे यांनी केली.