मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कोकणात जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार समाचार घेतला. ऊठ दुपारी, घे सुपारी अशी टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी, असं म्हटलं जातं. राज ठाकरे आज तेच करत आहेत, असा जोरदार हल्ला सुषमा अंधारे यांनी चढवला आहे.
कल्याण लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. आता राज ठाकरे यांची टाळी वाजवत असेल तर काय हरकत आहे. आपण त्यांच्या टाळ्या ऐकूया, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
दोन टप्प्यातील निवडणुकीचे विश्लेषण येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक हातातून निसटली आहे, असं भाजपच्या लक्षात आलं. त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस आणि मोदीपासून सर्वच बेताल वक्तव्य करत आहेत. मोदी एकीकडे उद्धवजी मित्र असल्याचे म्हणतात. तर मग उद्धव ठाकरे आजारी असताना मोदीने त्यांना सत्ता पटलावरून खाली उतरवले असते का? उद्धव ठाकरे यांचे गुडविल आहे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करण्यासाठी हे असे वक्तव्य करत असतात. त्यांच्या बालिशपणावरती काय बोलणार? असा हल्लाच अंधारे यांनी चढवला.
आशिष शेलार यांची मागच्यावेळी जागा हुकली होती. ती जागा त्यांना परत मिळावी. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्कटदाबी करू नये. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा शेलार यांची मुस्कटदाबी किती होते ते आपलं स्थान टिकू शकतात की नाही यावर त्यांनी लक्ष द्यावं. बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ, असा टोला त्यांनी शेलार यांना लगावला.
यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांना ईडीचं कौतुक करणं भाग आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते लोक गेले आहेत. प्रत्येकाला अस्तित्वाची भीती आहे. आमच्यासाठी राज्यभराचं वातावरण चांगलं आहे. आता थ्री प्लस वन असलो तरी तरी आम्ही जिंकणार आहोत. 15 पैकी चार ते पाच जागा तरी त्यांना टिकवता येतात का हे आधी त्यांनी सांगावं. गुलाबरावांनी शेरोशायरी, पोवाडे, कविता, अभंग या सगळ्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी कामाला येत नाही. त्या जिंकण्यासाठी तुम्ही केलेले काम कामे येतात, असंही त्या म्हणाल्या