विवेक गावंडे, बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक (Ravikant Tupkar) झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते भूमिगत आहेत. पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरु होती. त्यांनी सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम संपल्यानंतर त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अगदी पोलिसांच्या वेषात ते आले अन् अंगावर पेट्रोल ओतून घेतले. यामुळे काही काळ पोलीस गोंधळून गेले.
काय दिला होता इशारा
सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा केल्यानंतर तीन दिवसांपासून रविकांत तुपकर भूमिगत झाले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.
मोर्चात झाले सहभागी
शनिवारी सकाळी स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा निघाला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर आले. यावेळी तुपकर यांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवत अंगावर पेट्रोल ओतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आई आणि पत्नीसमोरच तुपकर यांनी अंगावर पेट्रोल घेतलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी लगेचच तुपकर यांना ताब्यात घेतलं.
कुटुंब सोबत
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या आंदोलनात त्यांचे कुटुंबसुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर, आई गीताबाई तुपकर यांनी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. शर्वरी तुपकर म्हणाल्या, की माझ्या पतीने आंदोलन करताना जाताना सांगून गेले की तुझ्या कपाळावरच कुंकूची काळजी करू नको. टोकाचं आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय.
कशासाठी दिला इशारा
सोयाबीन कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत, तसेच पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तर मागील तीन महिन्यापासून तुपकर हे आंदोलन करत आहेत.
मात्र सरकार काही याकडे लक्ष देत नसल्याने उद्या होणाऱ्या ११ तारखेच्या आंदोलनात तुपकरांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाची प्रशासनाने धास्ती घेतली आहे. या आंदोलनावर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. मात्र तुपकर हे काही मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत भूमिगत झाले असून मुंबई व बुलढाणा पोलिसांचे टेंशन वाढले असल्याचे सांगितले जात आहे.