महाड : महाडमधील तळीये मधलीवाडी गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले 40 मृतदेह आतापर्यंत काढण्यात आले आहेत. अजूनही काही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन गावातील परिस्थितीची माहिती घेतली. तसंच मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही धोकादायक गावांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. (Dangerous villages will be rehabilitated, a new policy within a month)
परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तळीये गावातील प्रकार अचानक घडला आहे. अशा गावांचा आढावा घेऊन गावांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. या सगळ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 38 मृतदेह मिळाले आहेत. हे सगळं प्रचंड वेदनादायी आहे. कुणीही याची कल्पना करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भविष्यात आपल्याला निसर्गाची काळजी घ्यावी लागेल. धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, महिनाभरात त्याबाबत नवं धोरण आणलं जाईल, अशी घोषणाही यावेळी वडेट्टीवार यांनी केलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती घेत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी भरपावसात हातात छत्री धरून स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व मदत करू. फक्त तुम्ही स्वत:ला सावरा, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. आक्रित म्हणावं असं आक्रित घडत आहे. पावसाळ्यात अनपेक्षित घटना घडत आहे. त्यामुळे त्यातून शहाणे होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून चक्रीवादळानेच पावसाळा सुरू होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक वस्त्या डोंगरदऱ्यात आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त पुनर्वसनाचा विचार करणार नाही. तर त्याचा आराखडा तयार करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
Dangerous villages will be rehabilitated, a new policy within a month