शाहिद पठाण | गोंदिया : तिरोडा -साकोली रोडवर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित गाडी ही तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले (Chintaman Rahangdale) यांच्या मालकिची असल्याची माहिती समोर येत आहे. हीरदेसिंग आसाराम टेकाम रा. मंगेझरी वय 70 वर्ष आणि संपत ठुररी आहाके. कोडेबर्रा वय 65 असे या अपघातामध्ये जागीच ठार झालल्या व्यक्तींची नावे आहेत. तर या अपघातामध्ये प्रताप संपत आहाके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तिरोडा येथील जिल्हा रुग्णालयात (district hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातामध्ये मृत्यू झालेले तिघे हिरदे सिंग टेकाम यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरवून आपल्या गावी परतत होते. हे तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. लग्न ठरवून परतत असताना तिरोडा -साकोली रोडवरील सर्रा गावाच्या परिसरामध्ये हा अपघात झाला. दुचाकी आणि चारचाकीची भिषण धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर चारचाकीमध्ये असलेले तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. तर चारचाकीचे देखील नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.