नाशिकः नाशिकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. त्यांना कल्याणपर्यंतचे अंतर चक्क लोकलने गाठता येणार आहे. त्यासाठीच्या नाशिक-कल्याण मेमू लोकलची चाचणी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास नववर्षाची गिफ्ट म्हणून ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे यांनी कंबर कसली आहे.
वंदे मातरमची चर्चाच
नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.
खासदार गोडसे यांचे प्रयत्न
नाशिक-कल्याण लोकसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले. त्यांनी लोकसभेत ही मागणी लावून धरली. त्यानंतर ही लोकल कुर्ला कारशेड येथे नेऊन ठेवण्यात आली होती. तिची अंतर्गत रचना दुरुस्त करण्यात आली. तिचे रूपडे बदलण्यासाठी 32 कोटींचा खर्च करण्यात आला. या लोकलच्या चाचणीसाठीही 9 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आता डिसेंबरमध्ये तरी या चाचणीला मुहूर्त लागावा. ती यशस्वी व्हावी आणि नवीन वर्षात नाशिकरांना हे गिफ्ट मिळावे, अशी आशा सामान्यांना आहे.
नाशिकहून मुंबईला या गाड्या
नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी राज्यराणी, पंचवटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या आहेत. जानेवारीपासून गाडी सुरू झाली तर त्यात नाशिक-कल्याण मेमू लोकलची भर पडणार आहे. 1 नोव्हेंबर 1975 रोजी नाशिकरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. या गाडीने नाशिकच्या सर्वांगिण विकासात मोठी भर घातली. या गाडीने रोज जवळपास 1000 जण प्रवास करतात.