नितेश राणेंचा शोध घेत असताना, पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावल्यावरून भाजप नेते आता चांगलेच संतापले आहेत, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. राणेंची पाठराखण करताना फडणवीसांनी पोलिसांना इतर गंभीर गुन्ह्यांकडे पोलिसांना लक्ष द्यायला वेळ नाही, मात्र राणेंच्या बाबतीत आहे, असा टोला लगावला आहे, तर भाजप नेते आशिष शेलार यांनीही याच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबान्यांसारखे वागत असल्याचा आरोप केला आहे.
आशिष शेलार यांचे ट्विट काय?
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! अशी खरमरीत टीका ठाकरे सरकारवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…
वारे वा..ठाकरे सरकार!
फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! pic.twitter.com/309mBmn382— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2021
संजय राऊत काय म्हणाले?
नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. एकीकडे सिंधुदुर्ग न्यायालयात नीतेश यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे पुन्हा शिवसेना विरुद्ध राणे असा सामना सुरू झाला आहे. यावरून राज्यात सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सध्या सुरू झाल्या आहेत.