मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अनिल परब यांना आतापर्यंत 44, 791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. ही आकडेवाडी पाहता अनिल परब यांना जवळपास 25 हजार मतांची लीड आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी लीड मिळाल्याची माहिती मिळत आहे. निरंजन डावखरे यांना तब्बल 58 हजार मतांची लीड मिळाल्याची माहिती समोर येत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांना केवळ 18 हजार मते मिळताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईची पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात ठाकरे गटाला, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपला यश मिळाल्याचं सध्याचं चित्र आहे. याबाबत आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजूनही काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आणि शिक्षक भारतीचे उमेदवार यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतांची गणनी करण्यात आली त्यामध्ये 5800 मतांचा विजयाचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र कुठल्याही उमेदवाराला हा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मते कुणासाठी निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपकडून शिवनाथ दराडे हे आहेत. तर ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर हे शर्यतीत आहेत. याशिवाय शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी 26 जूनला निवडणूक पार पडली होती. यानंतर आज या चार जागांचा निकाल समोर येत आहे. यासाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. या चारपैकी दोन जागांचा निकाल जवळपास निश्चित झालाय. आता मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक विभागीय मतदारसंघ यांच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “आतापर्यंतच्या मतमोजणी नुसार मुंबई पदवीधर मध्ये आमचे उमेदवार अनिल परब हे मोठ्या लीड वरती आहेत. जवळपास 25 हजार इतका मताधिक्य अनिल परब यांना पाहायला मिळते त्यामुळे इथला विजय निश्चित झालेला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा काँटे की टक्कर आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हे चित्र स्पष्ट होणं बाकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात सुद्धा आम्हाला विजयाचा विश्वास आहे. नाशिकच्या जागेबाबत फारसे अपडेट्स माझ्याकडे नाहीत. कोकण पदवीधर मध्ये आम्ही नक्कीच जिंकू असा विश्वास. मात्र त्या जागी जर आमचा उमेदवार असता तर आम्ही तो 100% जिंकला असता”, असा दावा वरुण सरदेसाई यांनी केला.