महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे. कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास होतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण तरीही काही कारणास्तव दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडाक्याच्या उन्हातून प्रवास करावा लागतोय. अनेकांना भर उन्हात काम करावं लागतंय. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे भर उन्हात उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पण उष्णतेच्या लाटेचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना धाराशिवमध्ये प्रचारसभेत चक्कर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कैलास पाटील यांना उष्माघातामुळे हा त्रास झालाय. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरु होती. यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे. ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एकीकडे कडाक्याच ऊन आहे तर दुसरीकडे प्रचारामुळे तापत असणारं राजकीय वातावरण अशी सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. ऐन उन्हाळ्यात ही निवडणूक आल्याने राजकीय नेत्यांना भर उन्हात प्रचार करावा लागतोय. फक्त नेतेमंडळीच नाही तर शेकडो, हजारो कार्यकर्त्यांना उन्हातून प्रचार करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपली काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.