महायुतीचे अखेर जागा वाटप झाले. परंतु या जागा वाटपानंतर महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. ठाण्याची जागा शिवसेनेला दिल्यामुळे भाजप नाराजमध्ये नाराजी सुरु झाली आहे. जो पर्यंत ठाण्यात कमळ चिन्हावर उमेदवार देत नाही तो पर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ठाणे लोकसभा जागेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांच्या नावाची वर्णी लागली. त्यानंतर त्याचे पडसाद महायुतीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये उमटले. भाजप पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवायला सुरवात केली आहे. माजी खासदार संजीव नाईक यांची उमेदवारी महायुतीमध्ये डावलल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मात्र ठाण्यातील भाजपच्या विभागीय कार्यालयात शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हके, माजी आमदार रवींद्र फाटक, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक समवेत भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत बैठक घेतली. त्यांनी नाराजी दूर झाल्याचे सांगितले गेले. परंतु जो पर्यंत भाजपच्या कमळ चिन्हांवर उमेदवार देत नाही, तोपर्यंत आम्ही ठाणे लोकसभेसाठी काम करणार नाही, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आज शिवसेना आणि भाजपची बैठक फोल ठरल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाचे ओवळा माजिवडा मंडळ अध्यक्ष ऍड हेमंत म्हात्रे, सरचिटणीस सचिन शिनगारे, सरचिटणीस जितेंद्र मढवी,जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष राकेश जैन,दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संजोयक डॉ. अक्षय झोडगे, पॅनल प्रमुख महेश ताजने,वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉ. अपर्णा ताजने, उत्तर भारतीय सेलचे संयोजक हिरा प्रसाद राय, सुपर वारीयर, शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख तसेच ओवळा माजिवडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी राजीनामे दिले.
नाराजी नाट्य दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहे. गणेश नाईक यांना आवरण्यासाठी फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्यात काल रात्री फोनवर चर्चा झाली. गणेश नाईक यांना पक्षश्रेष्ठींनी तंबी दिल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांत फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्यानंतर नाईक महायुतीच्या विजयासाठी कामाला लागणार आहे. यामुळे आज नाईक कुटुंब म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच काल नाराजांच्या बैठका घेणारे आमदार संजय केळकरच नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रस्तावक असतील, अशी माहिती दिली गेली आहे.