डोंबिवली : तरुणांमधील रिल बनवण्याचं फॅड दिवसे न् दिवस वाढत आहे. ते इतकं की वेगळं काही करण्याच्या आणि इम्प्रेशन झाडण्याच्या नादात या तरुणांना आपला जीवही गमवावा लागत आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथेही अशीच धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. ठाकुर्ली पंपहाऊस येथे रिल बनवत असताना एक तरुण विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा शोध घेतला. तब्बल 32 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ठाकुर्ली येथील पंपहाउसमधील खोल विहिरीत पडून मृत्यू एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. बिलाल सोहिल शेख असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रिल बनवण्यासाठी गेला होता. रील काढताना तोल जाऊन बिलाल विहिरीत पडला. दरम्यान त्याच्या दोन मित्रांनी तात्काळ ही माहिती विष्णूनगर पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी तरुणांचा शोध सुरू केला. तब्बल 32 तासाच्या शोध मोहिमेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अखेर विहिरीतून त्याचा मृतदेह शोधून काढला.
मुंब्रा येथे राहणारा 18 वर्षीय बिलाल सोहिल शेख हा तरुण दोन मित्रांसह शनिवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील पंपहाउस येथे रिल काढण्यासाठी गेला होता. रील काढताना बिलाल विहिरीत पडला. हे पाहून त्याचे दोन मित्र जवळील रेल्वे सुरक्षा बलाकडे गेले. मित्रांनी माहिती देताच रेल्वे सुरक्षा बलाने विष्णूनगर पोलिसांना कळविले. विष्णूनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडील अग्निशामक दलाला माहिती दिली. स्थानक अधिकारी रामचंद्र महाला, विनय कोयंदे, राजेश कासवे, केदार मराठे, महिला कर्मचारी या पथकांनी सदर ठिकाणी शोध कार्य सुरु केले. 32 तास शोध कार्य सुरु होते. सोमवारी सायंकाळी बिलाला यांचा मृतदेह अग्निशामक दलाच्या जवानांना बाहेर काढण्यास यश आले.
दरम्यान, या विहिरीत प्रचंड गाळ असल्याचं सांगण्यात येतं. तसेच ही विहीर खोल होती. त्यामुळे या मुलाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. या सर्व कारणांमुळेच या मुलाचा शोध उशिराने लागल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, मुंब्रा येथे राहत असताना केवळ रिल काढण्यासाठी हा तरुण ठाकुर्लीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.