ठाणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधून ठाण्यातील दिवा परिसरात देशातील पहिल्या सुमारे 10 हजार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ‘लस महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सध्यस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने एकाच वेळी तब्बल 10 हजार लसीकरणाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी उप महापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सौ. सुनिता मुंडे, नगरसेविका दर्शना म्हात्रे, दिपाली भगत, अंकिता पाटील, माजी उप महापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दीपक जाधव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त मनीष जोशी, नगर अभियंता अर्जुन अहिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रसाद पाटील. सहाय्यक आयुक्त अकला खैरे, एसएमजी शाळेचे संस्थापक मारुती गायकर आदी उपस्थित होते.
या लस महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा प्रभागात आरोग्य केंद्र व बसेसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. परंतु देशात पहिल्यांदाच एकाच वेळी सुमारे 10 हजार लसीकरण महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. दिव्याच्या विकासासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन सदैव कटिबद्ध असून नागरिकांचे लसीकरण देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा भव्य लसीकरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शहरात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेने ठेवले असून त्याचाच एक भाग म्हणून आज एकाच वेळी 10 हजार लस देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दिवा परिसरात कष्टकरी, कामगार वर्गाची संख्या जास्त आहे. त्यांना या महोत्सवाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले जात असून लवकरच शहर कोरोनामुक्त होईल, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून राज्यात मुंबई नंतर ठाणे महापालिका कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अव्वल ठरली आहे. आजपर्यंत 14 लाख लसीकरणाचा टप्प्या पूर्ण केला असून कोरोनाचा सामना करण्यासाठी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत लस देण्याचं नियोजन केले असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिव्यात सर्वसामान्य जनता राहत असून नोकरीनिमीत्त मुंबई शहारत ये-जा करणाऱ्या चाकरमारांची संख्या जास्त आहे. त्यांना प्रवास करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. आज मोफत लसीकराचा लस महोत्सव आयोजित केला असून दिवावासीयांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत माजी उप महापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी व्यक्त केले.
या लसीकरण महोत्सवामध्ये ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील 33 डॉक्टर्स, 144 नर्सेस तसेच 106 डेटा एन्ट्री ऑपरेटर व पेशंट निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने अत्यंत नियोजनबद्ध लसीकरण सुरू असून एकाच वेळी 10 हजार नागरिकांना लस उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त दिवावासीयांनी समाधान व्यक्त करत पालिका प्रशासनाचे आभार मानले.
हेही वाचा : स्थानिक पातळीवर कोण काम करतंय ते नागरिकांना माहिती, अमित ठाकरेंच्या टीकेला वरुण सरदेसाई यांचं उत्तर