काय चाललंय ठाण्यात? एका महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 05, 2024 | 4:10 PM

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे रुग्णालय कळवा येथे आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हे रुग्णालय एका वाईट बातमीसाठीच चर्चेत आलं होतं. या रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एकाच रात्री इतक्या जणांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामाकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी इतकं वातावरण तापल्यानंतर आता पुन्हा काही महिन्यांनी या रुग्णालयातील धक्कादायक बातमी समोर येत आहे.

काय चाललंय ठाण्यात? एका महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Follow us on

एखाद्या कुटुंबात बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ घरात किती आनंद घेऊन येतं याची कल्पना आपण करु शकत नाही. ते बाळ त्या कुटुंबाचं सर्वस्व असतं, आनंदाचं केंद्रबिंदू असतं. बाळाच्या प्रत्येक हालचालींवर आई-वडिलांचं विशेष लक्ष असतं. बाळाच्या आजी-आजोबांचा त्या बाळावर खूप जीव असतो. ते बाळ कुटुंबाचं प्राण बनतं. हेच नवजात बाळ काही कारणास्तव आजारी पडलं किंवा त्याचा जन्म रुग्णालयात झाला तर डॉक्टरांची त्या बाळाला बरं करण्याची सर्वस्वी जबाबदारी असते. डॉक्टरांना तर आपण देव मानतो. त्यामुळे डॉक्टर बाळाला बरं करतील, असं आपण गृहीत धरतो. पण कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयांवर आपण विश्वास ठेवावा का? असा प्रश्न निर्माण होतोय. संबंधित रुग्णालय हे ठाणे महापालिका हद्दीत आहे. सरकारकडून महापालिका हद्दीतील रुग्णालयांसाठी किती खर्च केला जातो. पण या रुग्णालयांमध्ये रुग्ण खरेच बरे होतात का? याचा अभ्यास करणं जास्त आवश्यक आहे. कालपर्यंत कळव्याच्या रुग्णालयात अनेक स्त्री-पुरुष दगावल्याची बातमी येत होती. पण आता तर या रुग्णालयात थेट नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात गेल्या महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हे नवजात बालक एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आली होती. पण त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. त्यामुळे रुग्णालयात नेमकं कामकाज कसं चालतं? इथले डॉक्टर नेमके काय करतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं होतं. संबंधित घटनेची दखल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित रुग्णालयाला भेट दिली होती. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी विविध सूचना देऊनही रुग्णालयात अद्याप सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातील नवजात मुलांवर योग्य ते उपचार झाले नसल्याच समोर आले आहे. तर दुसरीकडे नवजात बालक रुग्णालयात दाखल करण्याआधीच अत्यावस्थ असल्याचे सांगत रुग्णालयातील डॉक्टरांनी सारवासारव सुरु केली आहे.