रस्त्यावरुन आईसोबत रमत-गमत चालत असताना एका 3 वर्षाच्या मुलीसोबत अत्यंत दुर्देवी घटना घडली. असं काही घडेल असा विचारच कोणाच्या मनात आला नसेल. रस्त्यावरुन चालत असताना पाचव्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट 3 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडला. प्रचंड वेगात कुत्रा अंगावर पडल्याने मुलगी तिथेच कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालीय. एक अरुंद गल्लीबोळातून चालत असताना ही घटना घडली. ठाण्याजवळच्या मुब्रा परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली.
मुलगी आईसोबत चालत होती. आई दोन पावलं पुढे असताना अचानक मोठा आवाज झाला. मागे वळून पाहिलं, तर कुत्रा अंगावर पडून मुलगी जखमी झालेली. मागून येणाऱ्या महिलेने त्या मुलीला उचलून तिच्या आईच्या हातात दिलं. आई लगेच धावतपळत बेशुद्धवस्थेत असलेल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला मृत घोषित केलं.
कुत्र्याच काय झालं?
या घटनेत कुत्रा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वेटनरी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. मुंब्रा पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु झाली आहे. कुत्रा अपघाताने खाली पडला की, त्याला जाणीवपूर्वक खाली फेकण्यात आलं. पुढील तपास सुरु आहे. या घटनेत एक निष्पाप तीन वर्षाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.