कसारा: कसारा येथे आज सकाळी सकाळी जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं. कसाऱ्यात चालत्या लोकल ट्रेनमधून अचानक धूर निघून आग लागल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. भर गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने प्रवाशांच्या तोंडचं पाणी पळालं. अचानक घडलेल्या या बर्निंग ट्रेनच्या थरारामुळे प्रवाशांनी तात्काळ स्वत:हून ही आग विझवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. लोकलचा थोडासा भाग मात्र जळाला आहे.
आज सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी ही घटना घडली. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधून अचानक धूर निघाला. आसनगाव स्टेशनाजवळ लोकल आली असताना ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. या लोकलने कसारा स्टेशन काही वेळच झाला होता. इतक्यात लोकलमध्ये आग लागली. आधी लोकलमधून निघाला. त्यामुळे काही तरी जळाल्याचा वास प्रवाशांना आल्याने प्रवाशांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आगीचे लोळ दिसले. त्यामुळे प्रवाशी अधिकच घाबरले.
लोकलमध्ये आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने प्रवासी चांगलेच बिथरले. अनेकजण आगीपासून संरक्षण मिळण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले. तर काही प्रवाशांनी समोर येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
ट्रेन चालक आणि प्रवाशाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण करण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच आग पूर्णपणे विझल्याची खात्री करण्यात आली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही आग विझवल्याची पूर्ण खात्री करूनच लोकल सोडली.
दरम्यान, आग लागल्याची घटना कळाल्यानंतर ट्रेन चालकाने तात्काळ मध्येच लोकल थांबवली. त्यामुळे प्रवाशांनी पटापट लोकलमधून उड्या मारत अवघ्या काही क्षणात लोकल रिकामी केली. एकही प्रवाशी लोकलमध्ये थांबलेला नव्हता. सर्व प्रवासी उतरले होते. त्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे अप व डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे या मार्गावरील इतर रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. दाटीवाटी करतच मिळेल त्या ट्रेनने चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाल्याचं चित्र दिसत आहे.