Dombivali : डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

| Updated on: Feb 02, 2022 | 7:34 PM

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये 525 औद्योगिक भूखंड आहेत. तर 617 निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून 50 मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत.

Dombivali : डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार
Follow us on

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने (Factories) स्थलांतरित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली औद्योगिक वसाहतीस भेट दिल्यानंतर येथील घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व उद्योग विभागाने केलेल्या पाहणीनुसार 156 कारखाने रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वारंवार होणारे अपघात तसेच प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर येथील कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंबिवलीतील 156 धोकादायक कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत, असे देसाई म्हणाले. (According to Industry Minister Subhash Desai, 156 dangerous factories in Dombivali will be relocated)

प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली मुक्त होणार

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये 525 औद्योगिक भूखंड आहेत. तर 617 निवासी भूखंड आहेत. रासायनिक कारखान्यांमध्ये होणारे संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने रहिवासी भागांपासून 50 मीटर अंतरावर असलेले धोकादायक कारखाने स्थलांतरित केले जाणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सध्याच्या धोकादायक कारखान्यांना उत्पादनात बदल करून व्यापारी, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान संबंधी उत्पादने तयार करण्यास परवानी दिली जाणार आहे. डोंबिवलीतील कारखान्यांना पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील प्रचलित दराने भूखंड उपलब्ध करून दिले जातील. कारखाने स्थलांतरित होत असताना कामगार, पर्यावरण आदींबाबत योग्य निर्णय संबंधित विभाग घेतील.

महापे येथील जेम्स ज्वेलरी पार्क वेगाने पूर्णत्वाकडे

नवी मुंबईतील महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी टीटीसी औद्योगिक क्षेत्रात 86053 चौरस मीटर भूखंड वितरित करण्यात आला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड विकासाचा कालावधी पाच वर्षांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील हे रत्न आणि आभूषणे उद्योग उद्यान नमुनेदार पद्धतीने जेम्स व ज्वेलरी एक्सोर्ट प्रमोशन काऊन्सिलतर्फे विकसित केले जात आहे. या ठिकाणी 1354 दागिने उत्पादक कारखाने सुरू होतील. तर 1 लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी सुमारे 14 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्यात पाचशे कोटींची गुंतवणूक

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात उद्योग उभारण्यासाठी पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीने पुढाकार घेतला असून सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे. याद्वारे आदिवासी भागात सुमारे दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. येथे येणाऱ्या कंपन्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे. दरम्यान, लगतच्या सुरत परिसरातील अनेक उद्योगांनी नवापूर येथे उद्योग विस्तार करण्यात स्वारस्य दाखविले आहे.

इव्ही चार्जिंग स्टेशनसाठी प्राधान्याने भूखंड

विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसीकडून प्राधान्यांने भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दुचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भूखंड उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने अलिकडेच घोषित केलेल्या ईव्ही धोरणाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. (According to Industry Minister Subhash Desai, 156 dangerous factories in Dombivali will be relocated)

इतर बातम्या

KDMC Ward : केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू