‘मुख्यमंत्री करणार हे आधीच सांगितलं असतं तर अख्खा पक्षच फोडला असता’; अजितदादांची तुफान फटकेबाजी

| Updated on: Aug 07, 2024 | 9:30 PM

"काळाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. आज राज्याचे प्रमुख पद सांभाळत असताना ते त्यांच्या दरे या गावी जात असतात. तिथे शेती करताना त्यांचे फोटो काढतात. ते आम्ही पाहतो सोशल मीडियातून, मी देखील गावी असताना ६ वाजता शेतात जातो. मात्र आमचे फोटो येत नाही, त्यांच्या सारखी आमची फॉलोविंग नाही", अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली.

मुख्यमंत्री करणार हे आधीच सांगितलं असतं तर अख्खा पक्षच फोडला असता; अजितदादांची तुफान फटकेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आज पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे’ या चरित्रग्रंथाचे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रकाशन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, त्यांचा संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. विशेष म्हणजे अजित पवार यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं. भाजपने मुख्यमंत्री करणार हे आधीच सांगितलं असतं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा अख्खा पक्षच आणला असता, असं अजित पवार म्हणाले.

“आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतोय. सी. पी. राधाकृष्णन यांचा राज्यपालपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. हे प्राध्यापक ढवळ यांच्यामुळे होतंय. या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीत खूप काही घडलंय. त्यात एक शेतकरी कुटुंबातील मुलगा येतो काय, आणि काम करतो काय, त्यात नगरसेवक होतो, आमदार होतो. त्यानंतर मागे वळून पाहत नाही. मी 90 च्या बँचचा आहे. सगळे पुढे निघून गेले. शिंदेना मुख्यमंत्री करणार असं कळालं. मी मुख्यमंत्री करणार म्हणून सगळी पार्टीच आणली असती”, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांची टर्म ९९ ची आहे, शिंदे यांची २००४ ची आहे, मी यांना सिनियर आहे, मी ९० चा आहे. मात्र हे सर्व पुढे निघून गेले. यांनी मला सांगितलं असते की, एव्हढे आमदार आणल्यावर मुख्यमंत्री करणार, मी तर पार्टीच घेऊन आलो असतो”, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

‘मी देखील गावी शेतात जातो, मात्र आमचे फोटो येत नाही’

“लोकांच्या गराड्यात राहणारा हा मुख्यमंत्री आहे. मंत्रालयात कधीकधी आम्ही म्हणतो कॅबिनेटला खूप लोकांची गर्दी होते. माझ्या टर्मपासून अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र सारखं गराड्यात मिसळून राहणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही. आम्ही शेतात काम करतो. पण व्हिडीओ, फोटो कधी येत नाही. त्यांनी अनेक संकट झेलली आहेत. काळाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. आज राज्याचे प्रमुख पद सांभाळत असताना ते त्यांच्या दरे या गावी जात असतात. तिथे शेती करताना त्यांचे फोटो काढतात. ते आम्ही पाहतो सोशल मीडियातून, मी देखील गावी असताना ६ वाजता शेतात जातो. मात्र आमचे फोटो येत नाही, त्यांच्या सारखी आमची फॉलोविंग नाही”, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली. “पुस्तकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो हवा होता असे माझे मत आहे”, असंदेखील अजित पवार म्हणाले.