बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अक्षय शिंदे याचा सहा दिवसांपूर्वी पोलीस व्हॅनमध्येच कथित एन्काऊंटर करण्यात आला होता. या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला होता. अक्षयच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच पुरावे नष्ट होऊ नये यासाठी अक्षयचा मृतदेह दहन न करता दफन करण्यात यावा, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या वकिलांनी केली. हायकोर्टाने ती मागणी मान्य करत सरकारला अक्षयच्या मृतदेहाच्या दफनसाठी जागा उपलब्ध करण्याचा आदेश दिला होता. सरकारने अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. पण अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला.
अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. पण स्थानिकांनी विरोध केल्याने तिथे अंत्यसंस्कार करता आलं नाही. यानंतर अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती समोर आली. पण तिथेदेखील शिवसेनेकडून विरोध करण्यात आला. दरम्यान, अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर मुंबईत जे. जे. रुग्णालयात उपचार केल्यानंतर कळवा येथील रुग्णालयात आणण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या सहा दिवसांपासून अक्षयचा मृतदेह होता. त्यामुळे कळवा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती समोर येताच मनसेकडून विरोध करण्यात आला.
सर्वच ठिकाणी अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारास विरोध होत असल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढल्या होत्या. अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत अक्षय शिंदे याच्या मृतदेहास दफन करण्यात येईल, असं ठरलं. त्यानुसार रविवारी पहाटे पोलिसांनी तिथे खड्डा खोदला होता. पण स्थानिकांना त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीक तिथे आले. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि महिलांचाही समावेश होता. यावेळी महिलांनी अंत्यविधीसाठी खोदलेला खड्डा बुजवला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी स्मशानभूमीचा परिसर मोकळा केला आणि आंदोलकांनी बुजवलेला खड्डा पुन्हा खोदला.
यानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. यावेळी त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात होता. यानंतर आतादेखील स्मशानभूमीत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रोषणाई करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.